
सुनिल दैदावार ज्वालादिप न्युजचंद्रपुर जिल्हा प्रतिनिधीभद्रावती :- मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त दिनांक ६ जानेवारी रोजी पत्रकार दिन साजरा करण्यात आला. सन १८३२ साली त्यांनी सुरू केलेल्या दर्पण या पहिल्या मराठी वृत्तपत्रामुळे मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली गेली. समाजप्रबोधन, सत्यनिष्ठा व निर्भीड लेखन या मूल्यांचा पाया त्यांनी पत्रकारितेतून घातला. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत आजचे पत्रकार समाजातील वास्तव मांडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करीत असून पत्रकारितेची सामाजिक जबाबदारी अधिक बळकट करण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. पत्रकार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई तालुका शाखा भद्रावती यांच्या वतीने ग्रामीण रुग्णालय, भद्रावती येथे रुग्णांना फळवाटप करून पत्रकार दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीष सिंग यांच्यासह रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते. तसेच पत्रकार संघाचे पदाधिकारी सुनील दैदावार, शाम चटपल्लीवार, संतोष शिवणकर, महेश निमसटर, पुंडलिक येवले, अनिल इंगोले, विनोद वांढरे आदी पत्रकार बांधव उपस्थित होते. या उपक्रमातून पत्रकारितेची सामाजिक बांधिलकी अधोरेखित करत लोकहितासाठी सत्य, निस्पक्ष व जबाबदार पत्रकारिता करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.











