
मूर्तिजापूर स्वप्निल जामनिक: जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील शेलू वेताळ येथे भरलेल्या वेताळ बाबा यात्रेदरम्यान रक्तरंजित घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मंदिराजवळच चार युवकांच्या टोळीने जुन्या वादातून दोन युवकांवर चाकूने जीवघेणा हल्ला केला.
या हल्ल्यात दोन युवक गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने अकोल्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर काही काळ यात्रास्थळी प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
प्राप्त माहितीनुसार, या हल्ल्यातील मुख्य आरोपी मुसेफ हुसेन याने काही दिवसांपूर्वीच गाडगे बाबा चौक परिसरात एका युवकाच्या डोक्यावर अशाच प्रकारे जीवघेणा हल्ला केल्याचे समोर आले आहे. आरोपीवर यापूर्वीही मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद असल्याची माहिती आहे.घटनेनंतर आरोपी व त्याचे साथीदार घटनास्थळावरून फरार झाले असून, मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी आरोपीचा कसून शोध सुरू केला आहे. यात्रेसारख्या धार्मिक ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान, आरोपींना तात्काळ अटक करून कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.