बडनेरा : द्रुतगती महामार्गावरील वरुडनजीक उड्डाणपुलावर शनिवारी पहाटे दोनच्या सुमारास झालेल्या अपघातात चारचाकी वाहनातील तिघांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. अपघातग्रस्त वाहनात ट्रकचा बफर अडकला होता. बडनेरा पोलिसांनी अज्ञात वाहनाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषिकेश ज्ञानेश्वर कराळे (28), अजय रामखिलावन यादव (32, दोघेही रा. अर्जुननगर, अमरावती), रजत मेश्राम (32, रा. माहुली जहागीर) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. सुमित लक्ष्मण गोंदूरवार (30, रा. अर्जुननगर, अमरावती) हा गंभीर जखमी आहे.
चौघेही एमएच 27 डीएल 6699 क्रमांकाच्या कारमधून एक्स्प्रेस हायवेवर लोणी गावाकडून अमरावतीच्या दिशेने येत असताना वरुडा गावाजवळ हा अपघात झाला. स्थानिकांनी अपघाताची माहिती बडनेरा पोलिसांना दिली, त्यानंतर पोलीस आणि रुग्णवाहिका तत्काळ घटनास्थळी पोहोचली. दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाचा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. चौघेही एकमेकांच्या ओळखीचे होते. चारचाकी दुसऱ्या बाजूला फेकली गेली. अपघातग्रस्त वाहन रस्ता दुभाजक ओलांडून पलीकडे फेकले गेले. चालक आणि बाजूला बसलेले तरुण केबिनमध्ये अडकले. रक्तबंबाळ झालेल्या दोघांना पोलिसांनी बाहेर काढले. सहायक पोलिस निरीक्षक संदीप हिवाळे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ट्रकचा बफर घसरून अपघात चारचाकीच्या पुढील बाजूस नेमप्लेट असलेला बफर घसरला. हा बफर दुसऱ्या वाहनाचा असल्याचे लक्षात आल्यानंतर बडनेरा पोलिसांनी नांदगाव पेठ टोलनाक्यावरील सीसीटीव्ही तपासले असता हे बफर एका ट्रकचे असल्याचे आढळून आले.