अमरावती : भाजपचे नेते नवनीत राणा यांनी थेट शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे उमेदवार अभिजित अडसूळ यांच्याविरोधात प्रचार केल्याने महायुतीतील संघर्ष तीव्र झाला आहे. महायुतीच्या नेत्यांचे फोटो वापरल्याप्रकरणी युवा स्वामीभान पक्षाच्या उमेदवाराविरोधात आता अभिजित अडसूळ यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रमेश बुंदिले यांनी आपल्या प्रचार पोस्टरवर महायुतीच्या नेत्यांचे फोटो वापरल्याबद्दल अभिजित अडसूळ यांनी आक्षेप घेतला आहे. याप्रकरणी अभिजित अडसूळ यांनी याचिका दाखल करून निवडणूक आयुक्त, जिल्हाधिकारी अमरावती, दर्यापूर मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक अधिकारी आणि युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रमेश बुंदिले यांना या प्रकरणी प्रतिवादी बनवले आहे.
याप्रकरणी अभिजित अडसूळ यांनी सहा नोव्हेंबर रोजी सहाय्यक निवडणूक अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती.या अहवालानुसार संबंधित उमेदवाराकडून आदर्श आचारसंहितेचा भंग होत नसल्याचे दिसून येते, असे पत्र महायुतीचे उमेदवार अभिजित अडसूळ यांना देण्यात आले होते. या पत्राच्या आधारे अभिजित अडसूळ यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केली आहे.