विधानसभा निवडणुकीत वाशीम जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघात काट्याची लढत आहे. महायुती व मविआला बंडखोरी थोपवण्यात अपयश आल्याने वाशीम, रिसोड व कारंजा मतदारसंघात तिरंगी-चौरंगी सामने होणार आहेत. जातीय समीकरण व मतविभाजनाचे गणित कुणाच्या पथ्यावर पडणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या मैदानात प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. यावेळी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या वाशिम मतदारसंघात भाजप आणि शिवसेना ठाकरे गटात चुरशीची लढत आहे. भाजपने भाकरी उलटून चार वेळा आमदार राहिलेल्या लखन मलिक यांची उमेदवारी डावलली. श्याम खोडे यांच्यावर पक्षाने विश्वास दाखवला. त्यामुळे या जागेवर वरिष्ठांची नजर राहणार आहे. पक्षातील असंतोष दूर करण्यासाठी कार्यकारिणीतही फेरबदल करण्यात आले. त्याचा परिणाम जातीय समीकरणासह निवडणुकीवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे मागील निवडणुकीत वंचित आघाडीच्या तिकिटावर 52 हजार 464 मते मिळवून दुसऱ्या क्रमांकावर असलेले डॉ.सिद्धार्थ देवळे यांनी हातात मशाल घेतली. ते शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेले शशिकांत पेंढारकर हे गतवेळी ४५ हजार ४०७ मते मिळवून पुन्हा एकदा अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. वाशिममध्ये माविआ आणि महायुतीमध्ये बंडखोरी झाली. त्यामुळे मतांची विभागणी होणार आहे. वाशिममध्ये तिरंगी लढत होणार आहे.