पतंगोत्सवात वापरल्या जाणाऱ्या नायलॉन, चिनी व काचेचे आवरण असणाऱ्या मांज्यामुळे आजवर अनेक जण जायबंदी झाले आहेत.
नाशिक: पतंगोत्सवात वापरल्या जाणाऱ्या नायलॉन, चिनी व काचेचे आवरण असणाऱ्या मांज्यामुळे आजवर अनेक जण जायबंदी झाले आहेत. काही वर्षापूर्वी एका महिलेचा गळा कापला गेल्याने मृत्यू झाला होता. त्यामुळे यंदा पतंगोत्सवात नायलॉन, काचेचे आवरण असणाऱ्या टोकदार मांज्यांची निर्मिती, विक्री व वापरावर बंदी घालण्यात आली आहे. बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर तडीपारीची कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिला आहे.
मकरसंक्रांतीनिमित्त शहरात मोठ्या प्रमाणावर पंतंगी उडविल्या जातात. आतापासूनच पतंगप्रेमींच्या उत्साहाला उधाण येण्यास सुरुवात झाली आहे. पतंग, मांज्याची दुकाने थाटली गेली असून आकाशात पतंग विहरु लागल्या आहेत. पतंग उडविण्यासाठी विशेषत्वाने दुसऱ्याची पतंग काटण्यासाठी पर्यावरण व मानवी जिवितास हानीकारक ठरणाऱ्या नायलॉन मांजाचा वापर केला जातो. काही वर्षांपासून त्यावर बंदी असली तरी छुप्या पद्धतीने त्याची विक्री, वापर होत असल्याचे दरवर्षी दिसून येते. पतंगोत्सवात वापरलेला मांजा झाडे, वीज खांबांवर अडकून राहतो. पक्षी, प्राण्यांसह मानवी जिवितास तो धोका निर्माण करतो. दरवर्षी नायलॉन वा धारदार मांज्याने वाहनधारक जखमी झाल्याच्या घटना घडतात. वीज खांबावर पडलेल्या मांज्याने वीज पुरवठ्यात अडथळे येतात. २०२० मध्ये नायलॉन मांज्याने मान कापली गेल्याने महिलेचा मृ़त्यू झाला होता. पोलीस यंत्रणा दरवर्षी नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारत असली तरी हे प्रकार थांबलेले नाहीत. हे लक्षात घेऊन यंदा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द अधिक कठोर कारवाई करण्यात येणार असून अशा मंडळींना तडीपार केले जाणार आहे.
शहरात खबरदारीचा उपाय म्हणून पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या नायलॉन व काचेचे आवरण असणाऱ्या धारदार मांज्याची निर्मिती, विक्री व वापरावर बंदी घालण्यात आली आहे. चार ते १८ डिसेंबर या कालावधीसाठी हे निर्बंध लागू असतील. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहितेतील कायद्यान्वये कारवाई केली जाईल. महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वये कोणत्याही व्यक्तीच्या हालचाली, कृत्य अन्य व्यक्तींना, मालमत्तेस भय, धोका व इजा निर्माण होण्याचा संभव आहे, अशा व्यक्तींना तडीपार करण्याची कारवाई परिमंड निहाय केली जाणार आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पर्यावरण संरक्षण कायद्यान्वये कारवाई केली जाईल, असे पोलीस आयुक्त कर्णिक यांनी सूचित केले आहे.