बांगलादेशातील हिंदू अत्याचारावर तुम्ही गप्प का आहात? उद्धव ठाकरेंनी भाजपवर सडकून टीका केली

0
18

मुंबई – बांगलादेशात जे हिंदूवर अत्याचार होतायेत त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाऊले उचलायला हवीत. जिथे अत्याचार होतायेत तिथे धमक दाखवण्याची गरज आहे. आमच्या खासदारांनी मोदींना भेटीची वेळ मागितली होती परंतु ती नाकारली गेली. पंतप्रधान खूप व्यस्त आहेत. त्यामुळे कदाचित बांगलादेशातीलहिंदूवरील अत्याचार त्यांच्या निदर्शनात आले नसतील. केंद्र सरकारने तात्काळ काय पाऊले उचलणार हे स्पष्ट करावे. संसदेत बाकीचे विषय एक दिवस बाजूला राहूद्या. बांगलादेशात हिंदूंवर होणारे अत्याचार त्यावर केंद्र सरकारने भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मातोश्रीवरील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

उद्धव ठाकरे म्हणाले की, संसदेत महत्त्वाच्या विषयाला बगल देऊन चर्चा भरकटवली जातेय. बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होतायेत. २-३ महिन्यापूर्वी बांगलादेश क्रिकेट संघ भारतात आला होता तेव्हा आदित्य ठाकरे यांनी जर त्या देशात हिंदूवर हल्ले होत असतील तर त्यांच्या क्रिकेट संघाला इथं बोलावणे योग्य आहे का असा प्रश्न केला पण त्याला काही उत्तर आले नाही. आज तमाम हिंदूतर्फे माझी पंतप्रधानांना विनंती आहे जसं आपण एका फोनमध्ये युक्रेनचं युद्ध थांबवले होते तसं बांगलादेशातील हिंदूवरील अत्याचार रोखण्यासाठी पाऊले उचलायला हवीत. इथे बटेंगे कटेंगे करून उपयोग नाही. जिथे काही नाही तिथे छाती फुगवून दाखवण्यात अर्थ नाही पण जिथे अत्याचार होतायेत त्यांना आपली धमक दाखवण्याची गरज आहे असं त्यांनी सांगितले. 

त्याशिवाय ८० वर्षापासून दादर स्टेशनवर हमालांनी बांधलेल्या हनुमान मंदिराला भाजपा सरकारने नोटीस पाठवली. रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण केल्याचं म्हटलं आहे. ८० वर्ष जुने मंदिर भाजपा पाडायला निघाले हे कुठले हिंदुत्व?, मंदिराच्या जमिनीवर सिडको डोळा ठेवते. सरकार मंदिर वाचवू शकत नाही. भाजपाचं निवडणुकीपुरतं हिंदुत्व बाकी आहेत. हिंदू केवळ मतांपुरते राहिलेत. तुमच्या हिंदुत्वाची व्याख्या काय?. हिंदूंची मते पाहिजे, त्यांना भयभीत करायचे आणि सरकार आल्यानंतर मंदिरे सुरक्षित कशी आहेत? बांगलादेशातही आणि मुंबईतही मंदिर सुरक्षित नाही असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला.  दरम्यान, आपल्या मुंबईतले मंदिर हमालाने कष्टाने बांधले आहे. हे मंदिर पाडण्याचा फतवा निघतो तेव्हा भाजपा आणि फडणवीसांचे हिंदुत्व काय करतेय, नवी मुंबईत मंदिराच्या जमिनीवर सिडकोचा डोळा आहे. एक है तो सेफ है मग मंदिर कुठे सेफ आहे? कटेंगे तो बटेंगे करत हिंदुंना घाबरवता कशाला?. बांगलादेशात हिंदू सुरक्षित नाहीत, माझ्या राज्यात हिंदूची मते पाडली जातायेत. ज्या हिंदूंच्या मतांवर तुम्ही निवडून आलात ते वाचवण्यासाठी तुम्ही काय करणार आहात? आधी सरकारने सांगावे. बांगलादेशातील इस्कॉन मंदिर जाळले गेले. मुख्य पुजाऱ्याला अटक झाली. आपले विश्वगुरू काय करतायेत? शेख हसीना भारतात येऊन सुरक्षित झाल्या परंतु बांगलादेशात हिंदू असुरक्षित आहे. युक्रेनचे युद्ध थांबवणारे बांगलादेशात हिंदू अत्याचारावर गप्प का? असा सवालही ठाकरेंनी उपस्थित केला. 

अजून किती राक्षसी बहुमत हवं?  भाजपा फोडाफोडीचं राजकारण करतायेत. हिंदुत्व वैगेरे झुठ आहे. अजून किती राक्षसी बहुमत हवे? सत्तेचा विस्तार करण्यासाठी केवळ हिंदूंना वापरताय का? इतके दिवस अजून मंत्रिमंडळाचा विस्तार नाही. लाज, लज्जा शरम असेल तर भाजपाने बांगलादेशात होणाऱ्या हिंदू अत्याचारावर बोलावे. दादर स्टेशनवरील मंदिर पाडण्याचा फतवा त्यावर बोलावे. त्यानंतर नवी मुंबईत मंदिराच्या जमिनीवर सिडकोचा डोळा असून तो भूखंड कोणाला देणार त्यावर बोलावे. निवडणुकीच्या निकालाबाबत लोकांना शंका आहे असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी भाजपावर करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here