परभणी आंदोलनातील आरोपीचा न्यायालयीन कोठडीतील मृत्यू

0
16

परभणी: शहरात संविधान अवमान घटनेनंतर बुधवारी आंदोलन झाले. यात तोडफोड आणि नुकसानीच्या प्रकरणात नवा मोंढा ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. यात एका आरोपीस न्यायालयीन कोठडी मिळाली होती. हा आरोपी कारागृहात कोठडीत होता. त्याला जिल्हा रुग्णालयात रविवारी सकाळी आणले होते. त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. ही घटना शहरात तसेच जिल्ह्यात समजताच अनेकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. यानंतर आंबेडकरी चळवळीतील शहरातील प्रमुख नेत्यांनी जिल्हा रुग्णालय गाठून पोलीस आणि आरोग्य यंत्रणेतील अधिकाऱ्यांशी संवाद साधला. 

सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी (३६, रा. भोसरी, जि. पुणे, ह.मु.शंकर नगर, परभणी) असे मयत इसमाचे नाव असल्याची माहिती पोलीस आणि सूत्रांनी दिली. ही घटना रविवारी सकाळी समजताच पोलीस दलाने सुद्धा जिल्ह्यातील आणि इतर ठिकाणी जाणाऱ्या येणाऱ्या बसेसची सेवा त्वरित बंद केली. जिल्हा रुग्णालयात दुपारी साडेबारा वाजेपर्यंत आंबेडकरी चळवळीतील प्रमुख नेते, पदाधिकारी यांच्यासह युवकांनी मोठी गर्दी केली होती. सदरील इसमाच्या मृत्यूनंतर इनक्वेस्ट कॅमेरा शवविच्छेदन पूर्ण व्हावे, यासाठी आता सर्व आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले.

नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमप हे रविवारी सकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्यान परभणीत दाखल झाले असून त्यांनी जिल्हा रुग्णालयात भेट दिली. त्यानंतर आंबेडकरी चळवळीतील नेत्यांशी संवाद साधून ते पोलीस अधीक्षक कार्यालयात रवाना झाले आहेत. शहरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन छत्रपती संभाजीनगर येथे व्हावे, अशी मागणी केली आहे. त्यानंतर या मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here