Sanjay Raut : विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला अपयशाला सामोरं जावं लागलं. विधानसभेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवावर आघाडीच्या नेत्यांकडून विचारमंथन करण्यात येत आहे. तसेच आगामी महापालिकेच्या निवडणुकीची तयारीही सर्वच राजकीय पक्षांकडून आतापासून सुरु करण्यात आली आहे. दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट आतापासून सावध पावलं टाकत असल्याची चर्चा आहे. तसेच मुंबई महापालिकेची निवडणूक ठाकरे गट स्वबळावर लढणार असल्याची चर्चा आहे. आता यासंदर्भात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठं भाष्य केलं आहे. “दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि आम आदमी पक्षात जे घडलं तेच कदाचित उद्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत होऊ शकतं”, असं सूचक भाष्य संजय राऊत यांनी केलं आहे.
संजय राऊत काय म्हणाले?
“आम्ही अनेकदा म्हटलं आहे की काँग्रेस मोठा पक्ष आहे. मात्र, दिल्लीत आम आदमी पक्ष मोठा पक्ष आहे. निवडणुका लढवताना कार्यकर्त्यांचा एक प्रकारचा दबाव असतो. विधानसभा असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असो. पण दिल्लीत आम आदमी पक्ष अर्थात केजरीवाल यांची ताकद जास्त आहे. सध्या दिल्लीतील वातावरण असं आहे की दिल्लीच्या निवडणुकीत आम आदमी पक्ष मोठ्या मताधिक्यांनी जिंकेल. आमच्या पक्षाला दु:ख आहे की काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने एकमेकांवर टीका टिप्पणी करणं योग्य नाही”, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.