Chandrapur : मुख्यमंत्र्यांच्या चंद्रपूर दौऱ्यात राजकीय नाराजीनाट्य; विजय वडेट्टीवारांना मानाचे पान;सुधीर मुनगंटीवार नाराज?

0
3

चंद्रपूर : राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पहिल्यांदाच चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. मात्र त्यांच्या या दौऱ्यात माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहतील का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्याचे दुसरे मुख्यमंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे सुपुत्र मा.सा. कन्नमवार यांची आज 125वी जयंती आहे. या 125व्या जयंतीनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज चंद्रपूरला येणार आहेत. 

विशेष म्हणजे चंद्रपूरचे भाजप आमदार किशोर जोरगेवार हे या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आणि स्वागताध्यक्ष आहेत आणि या कार्यक्रमाला चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व आजी माजी खासदार-आमदार यांना निमंत्रित करण्यात आलं आहे. मात्र या कार्यक्रमाला भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहणार का याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. मुनगंटीवार यांच्या समर्थकांच्या मते सुधीर मुनगंटीवार यांचं नाव निमंत्रण पत्रिकेत प्रमुख पाहुण्यांच्या यादीत टाकण्यात आलं आहे.  तर दुसरीकडे माजी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष पद देण्यात आलेलं आहे.  तर माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांना या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आलं आहे. मुनगंटीवार समर्थकांच्या मते हा त्यांना डावलण्याचाच प्रयत्न आहे. त्यामुळे मुनगंटीवार आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता फार कमी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here