Kirit Somaiya : बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप

0
71

अमरावती : भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यात 1100 हून अधिक बांगलादेशी व रोहिंग्या मुसलमानांना फसव्या कागदपत्रांच्या आधारे जन्म प्रमाणपत्रे दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या तक्रारीची दखल घेत अमरावती जिल्हा प्रशासनाने गुरुवारी या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी समिती गठित केली आहे. दरम्यान, या आरोपानंतर या प्रकरणातील तथ्य तपासण्यासाठी किरीट सोमय्या हे आज अंजनगाव सुर्जी आणि अमरावती तहसील कार्यालयाला भेट देणार आहेत. याआधी सोमय्या यांनी असाच प्रकार नाशिक जिल्ह्यातील मालेगावात झाल्याचा आरोप केला होता. यानंतर सोमय्या यांनी मालेगावला भेट दिली होती. सोमय्या यांच्या अंजनगाव सुर्जी आणि अमरावतीच्या दौऱ्यानंतर या प्रकरणी वातावरण आणखी तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सोमय्या यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार 

भाजपचे माजी खासदार आणि किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेल्या तक्रारीत मालेगाव व अंजनगाव सुर्जीचा उल्लेख करून या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, अंजनगाव सुर्जी येथील तहसीलदारांनी गेल्या सहा महिन्यांत 1100 बांगलादेशी व रोहिंग्या मुसलमानांना फसव्या कागदपत्रांच्या आधारे जन्म प्रमाणपत्रे दिली आहेत अशी तक्रार केली होती. या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.

सोमय्यांच्या तक्रारीनंतर अमरावतीत चौकशी समिती 

माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या तक्रारीची दखल घेत अमरावती जिल्हा प्रशासनाने 9 जानेवारीला या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी समिती गठित केली आहे. दर्यापूरचे उपविभागीय अधिकारी या समितीचे प्रमुख असतील, ज्यात उपविभागीय पोलीस अधिकारी, गटविकास अधिकारी आणि मुख्य अधिकारी सदस्य म्हणून असतील. समितीला प्रकरणाची सखोल चौकशी करून त्वरीत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here