अमरावती : राज्यात बारदान्याअभावी ठप्प झालेली सोयाबीन खरेदीची मुदत १२ जानेवारी रोजी संपल्यानंतर पुन्हा एकदा केंद्र सरकारने ३१ जानेवारीपर्यंत खरेदीस मुदतवाढ दिली. तरीही विदर्भातील बाजारात सोयाबीनच्या दरात घसरण सुरूच आहे.
मंगळवारी अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत ६ हजार २१० क्विंटल सोयाबीनची आवक झाली. किमान ३ हजार ९५०, तर कमाल ४ हजार ११० रुपये म्हणजे सरासरी ४ हजार ६० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. गेल्या ११ जानेवारीला ७ हजार ५३९ क्विंटल आवक होऊन किमान ३ हजार ९५०, कमाल ४ हजार २१२ म्हणजे सरासरी ४ हजार ८१ रूपये प्रति क्विंटल दर मिळाला होता. गेल्या तीन ते चार दिवसांत सोयाबीनच्या दरात २० रुपयांची घट झाली आहे. विदर्भातील इतर बाजार समित्यांमध्ये हीच परिस्थिती असून अनेक ठिकाणी सोयाबीनचे सरासरी खरेदी दर हे चार हजारांपेक्षा कमी आहेत.