अकोला : अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे साडेतीन हजारावर शिष्यवृत्तीचे अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती धोक्यात येऊ शकते. कोणीही पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू नये, यासाठी समाजकल्याण विभागाने महाविद्यालयांना तंबी दिली.
अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, मॅट्रिकोत्तर शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रमांशी संलग्न असलेल्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना विद्यावेतन आणि व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना राबविण्यात येतात.
चालू शैक्षणिक वर्षाचे महाडीबीटी पोर्टल ऑनलाईन अर्ज स्वीकृती करण्यासाठी २५ जुलै २०२४ पासून सुरू झाले. गेल्या सहा महिन्यांचा कालावधी लक्षात घेता मागील वर्षाच्या तुलनेत विद्यार्थ्यांचे अर्ज कमी प्रमाणात भरले गेले आहेत. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत, त्यापैकी बरेच अर्ज अद्यापही महाविद्यालयस्तरावर पडताळणीसाठी प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले. चालू आर्थिक वर्ष संपुष्टात येण्यास ७४ दिवसांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे.
मागील वर्ष २०२३-२४ मध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाचे एकूण १५ हजार ४७५ अर्ज नोंदणीकृत झाले होते. मागील वर्षाच्या तुलनेत अकोला जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील सर्व योजनांचे सुमारे १० हजार ७४५ विद्यार्थ्यांचे अर्ज नोंदणीकृत झाले असल्याचे दिसते. या अर्जांपैकी विद्यार्थी स्तरावर ५११ व महाविद्यालय स्तरावर तीन हजार ४९६ अर्ज प्रलंबित आहेत.