अमरावती : ‘बहुजन सुखाय’ सोबतच ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद घेऊन वाटचाल करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाला सध्या मोठ्या प्रमाणात निघणाऱ्या भंगार बसेसच्या आव्हानाला तोंड द्यावे लागत आहे. गेल्या तीन वर्षांत १४९ बसेस भंगारात काढाव्या लागल्या. आता येत्या मार्च अखेर आणखीन ३४ बसेस भंगारात जाणार आहेत.
यामुळे प्रशासनाला प्रवाशांना बससेवा देताना कसरत करावी लागत आहे. विशेष म्हणजे गेल्या दीड वर्षांत अमरावती जिल्ह्यातील आगारांना केवळ २० नवीन बसेस मिळाल्या आहेत.
अनेक बसेसही जुन्या झाल्यामुळे भंगार बसमधूनच प्रवाशांना जावे लागत आहे. नोंदणीनंतर पंधरा वर्षांचा कालावधी ओलांडला तर संबंधित बसही भंगारात काढावी लागते. अगोदरच बसेसची संख्या कमी असल्यामुळे आणि भंगार बसेसचे प्रमाण वाढल्यामुळे आता अमरावतीच्या एसटी महामंडळाकडे ३१६ बसेसच उरल्या आहेत.
यातील अनेक बसेसनी पंधरा लाख कि.मी.चा प्रवास देखील पूर्ण केला आहे. प्रवाशांची वाढती संख्या व नादुरुस्त बसेसचे प्रमाण पाहता, अमरावती जिल्ह्यासाठी नवीन बसगाड्यांची गरज आहे. तसा प्रस्ताव देखील शासनाकडे पाठविला असून हा विषय प्रलंबित राहिला आहे. अमरावती जिल्ह्याला किमान यावर्षी २७१ बसेसचा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.