माहिती आधिकारात मिळविलेल्या कागदपत्रांचा आधार घेत आरोप करण्याच्या कार्यशैलीतील ‘अग्रेसर’ असणारे भाजपचे किरिट सोमय्या यांनी सिल्लोड मतदारसंघात बांगलादेशी मुस्लिम आले आहेत व त्यांना चार हजार ७३० बनावट जन्म – मृत्यूचे प्रमाणपत्र दिले गेल्याचा आरोप केला. सिल्लोडमध्ये असे सर्वाधिक अर्ज आले.
याच तालुक्यातून त्यांना जन्म प्रमाणपत्रे वाटप करण्यात आले. या आरोपाला पालकमंत्री संजय शिरसाट यांनीही दुजोरा दिला असून केवळ सिल्लोडच नाही तर छत्रपती संभाजीनगर शहरातही बांगलादेशी मुस्लिम असावेत त्यामुळे त्याचे सर्वेक्षण केले जाईल, असे जाहीर केले आहे. त्यामुळे हा नवा मुद्दा महापालिका निवडणुकीमध्येही केंद्रस्थानी असू शकतो, अशी चिन्हे आहेत.
बांगलादेशी वास्तव्याच्या प्रकरणामुळे शहरात नव्याने सर्वेक्षण करण्याची घोषणा पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केली आहे. या नव्या कारवाईमुळे महापालिका निवडणुकीत शिवसेना व भाजपसह ‘एमआयएम ’या तिन्ही पक्षांना निवडणुकीत नवा मुद्दा मिळाला आहे. दरम्यान प्रशासकीय पातळीवर आता जन्म- मृत्यूचे दाखले देण्याची कारवाई सिल्लोड तालुक्यात स्थगित करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगरमधील यापूर्वीच्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये शहरातील समस्यांपेक्षाही मतपेढीमध्ये ‘ हिंदू – मुस्लिम ’ हाच भेद केला जात होता. पूर्वी ही प्रक्रिया उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक नेते मंडळी करत होते. आता मुस्लिम विरोधाचा आवाज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक नेते व कार्यकर्ते करत आहेत. पालकमंत्री संजय शिरसाट , जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ ही मंडळी हिंदूत्त्वाचा झेंडा उंचावत असल्याचे कार्यक्रम आखत आहेत.