‘सध्याचे सरकार गतिमान नाही, केवळ देवेंद्र फडणवीस एकटेच काम करताहेत’; सुप्रिया सुळे यांचं विधान

0
58

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. असे असताना आता विधानसभा निवडणुकीत मतदारांनी महायुती सरकारला स्पष्ट बहुमत दिले. मात्र, अजूनही पालकमंत्रिपदाचा घोळ संपलेला नाही. सरकार गतिमान नाही. केवळ देवेंद्र फडणवीस एकटेच काम करत आहेत. राज्यात ‘वन मॅन शो’ कारभार सुरू आहे, अशी टीका राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

राज्यातील विविध मुद्यांवरून त्यांनी भाष्य केले. त्या म्हणाल्या, ‘महायुतीच्या सरकारमध्ये समन्वय नाही. सरकार येऊन 60 दिवस झाले तरी अजूनही सर्व मंत्री कामाला लागलेले नाहीत. विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे मुख्यमंत्री फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये देण्याचा निर्णय तातडीने घ्यावा. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करावा. केवळ निवडणुकीचा जुमला होता म्हणून वेळ मारून नेऊ नये. पीकविमा, वेमा, हार्वेस्टरच्या अनुदानातील घोटाळ्याचा प्रश्न लोकसभेमध्ये विचारणार आहे. याचे पुरावे गोळा करत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

चंदगडचे आमदार कोणती हवा खाऊन आले?

खासदार सुळे म्हणाल्या, ईव्हीएम यंत्रासंबंधी मतदारांमध्ये संभ्रम आहे. माझी निवडणूकही या यंत्रावर झाली तरी मतदारांचा ईव्हीएमवरील विश्वास उडालेला आहे. कागल, चंदगडमध्ये आता निवडून आलेल्यापेक्षा आमच्या उमेदवार किती तरी पटीने चांगल्या, सुसंस्कृत होत्या. काही तरी करून दाखवण्याची उमेद त्यांच्यामध्ये होती. पण वेगळीच हवा खाऊन आलेले आमदार झाले, असेही त्यांनी म्हटले आहे.

भ्रष्टाचारावरही केलं भाष्य

राज्यातील कृषी खात्यात भ्रष्टाचार झाल्याची कबुली राज्याच्या कृषिमंत्र्यांनी दिल्याचे वृत्त मी स्वतः पाहिले आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला पैसे येत नाहीत, असे देखील ते म्हणाले आहेत. त्यामुळे त्यांचे मी आभार मानते, असे सांगत खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत आपण अर्थसंकल्पात चौकशीची मागणी करणार असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here