मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या २२६४ घरांसाठी ५ फेब्रुवारीला ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात सोडत काढली जाणार आहे. त्यातील २२६४ घरांसाठी २४ हजार ९११ अर्ज दाखल झाले असले तरी २२६४ घरांपैकी तब्बल ७१३ घरांना एकही अर्ज दाखल झालेला नाही.
म्हाडा गृहनिर्माण आणि १५ टक्के एकात्मिक योजनेतील घरांकडे इच्छुकांनी पाठ फिरविली आहे. मात्र त्याचवेळी खासगी विकासकांच्या घरांना अर्थात २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील घरांना मात्र अर्जदारांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. २० टक्के योजनेतील ५९४ घरांसाठी तब्बल २३ हजार ५७४ अर्ज आले आहेत. एकूण प्राप्त अर्जांच्या ९० टक्क्यांहून अधिक अर्ज २० टक्क्यांतील घरांसाठी दाखल झाले आहेत.
कोकण मंडळाकडून २२६४ घरांसाठी ११ ऑक्टोबरपासून अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मूळ वेळापत्रकानुसार ही प्रक्रिया १० डिसेंबरपर्यंत होती तर २७ डिसेंबरला सोडत काढण्यात येणार होती. मात्र या विहित मुदतीत घरांना प्रतिसाद न मिळाल्याने सोडतीला दोनदा मुदतवाढ देण्यात आली. परिणामी सोडतीची तारीख दोनदा पुढे ढकलण्यात आली आणि आता मात्र अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया संपुष्टात आली असून आता ५ फेब्रुवारीला २२६४ घरांसाठी सोडत काढली जाणार आहे.
प्रत्यक्षात या दिवशी २२६४ घरांपैकी १५५१ घरांसाठी सोडत निघणार आहे. कारण २२६४ घरांपैकी ७१३ घरांना शून्य प्रतिसाद मिळाला आहे. शून्य प्रतिसाद मिळालेल्या या घरांमध्ये १५ टक्के एकात्मिक योजनेसह म्हाडा गृहनिर्माण योजनेतील घरांचा समावेश आहे. १५ टक्के योजनोतील ८२५ घरांसाठी केवळ ४१७अर्ज दाखल झाले असून ४०८ घरांना प्रतिसाद मिळालेला नाही. तर म्हाडा गृहनिर्माण योजनेतील ७२८ घरांसाठी केवळ ४३४ अर्ज दाखल झाले असून ३०५ घरांना प्रतिसाद मिळाला आहे. दरम्यान २२६४ घरांच्या सोडतीतील ११७ भूखंडांसाठी १४७ अर्ज सादर झाले आहेत.