मुंबई : स्थावर संपदा क्षेत्रातील दलालांच्या सहाव्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेला एकूण ७६२४ उमेदवार बसले होते, त्यापैकी ६७५५ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. या तिसऱ्या परिक्षेचा निकाल ८९ टक्के लागला आहे. उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थींमध्ये मुंबईतील ८४ वर्षीय दौलतसिंह गढवी यांचा समावेश आहे. एकूण उत्तीर्ण परीक्षार्थींमध्ये महिलांचाही समावेश लक्षणीय आहे. या परीक्षेत एकूण १११८ महिला दलाल उतीर्ण झाल्या आहेत.
रेरा कायद्यानुसार विकासकांबरोबरच स्थावर संपदा क्षेत्रातील दलालांनाही महारेरा नोंदणी बंधनकारक आहे. त्यापुढे जात महारेराने दलालांसाठी प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र बंधनकारक केले असून महारेराकडून प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र परीक्षा घेतल्या जातात. त्यानुसार नुकतीच दलालांची सहावी परीक्षा पार पडली असून त्या परीक्षेचा निकाल महारेराकडून सोमवारी जाहीर करण्यात आला आहे. परीक्षेचा ८९ टक्के निकाल लागला आहे. सहाव्या परीक्षेसाठी ७६२४ उमेदवार बसले होते. त्यापैकी ६७५५ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण परीक्षार्थींमध्ये ५६३७ पुरुष दलाल असून १११८ महिला दलाल आहेत. महत्त्वाचे म्हणजे ६७५५ पैकी २६४ दलाल ज्येष्ठ नागरीक अर्थात ६० वर्षांपुढील आहेत. उत्तीर्ण ज्येष्ठ नागरीक दलालांपैकी १३ महिला दलाल आहेत. मुंबईतील दौलतसिंह गढवी हे सर्वात ज्येष्ठ ८४ वर्षाचे दलाल आहेत.