Torres Case Update: टोरेस कंपनीच्या CEO ला पुण्याजवळून अटक; मुंबई पोलिसांची मोठी कारवाई!

0
59

मुंबई-पुण्यातील नागरिकांना शेकडो कोटींचा गंडा घालणाऱ्या टोरेस कंपनी घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. टोरेसची मूळ कंपनी असणाऱ्या प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेडचा सीईओ अर्थात मुख्य कार्यकारी अधिकारी असणाऱ्या मोहम्मद तौसिफ रियाझला पोलिसांनी पुण्याजवळून अटक केली आहे. त्यामुळे शेकडो नागरिकांची फसवणूक करणाऱ्या या घोटाळ्यातील अनेक बाबी उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे, मोहम्मद तौसिफ रियाज हाच या प्रकरणातील व्हिसलब्लोअर अर्थात प्रकरणाला वाचा फोडणारा व्यक्ती असल्याचा दावा सुरुवातीला करण्यात आला होता.

टोरेस प्रकरणातली आत्तापर्यंतची पाचवी अटक

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं ही अटकेची कारवाई केली आहे. मोहम्मद तौसिफ रियाझ उर्फ जॉन कार्टर हा या प्रकरणाला वाचा फोडणारा अर्थात व्हिसलब्लोअर असल्याचा दावा सुरुवातीला करण्यात आला होता. शनिवारी रात्री रियाजला पुण्याजवळून अटक करण्यात आल्याच्या वृत्ताला आर्थिक गुन्हे शाखेनं दुजोरा दिल्याचं इंडियन एक्स्प्रेसनं म्हटलं आहे. रियाजला मुंबईत आणल्यानंतर रविवारी त्याला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यानंतर त्याची ३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here