उत्तर प्रदेशमध्ये आयोजित महाकुंभचा आज १५ वा दिवस आहे. महाकुंभ मेळ्यात आज धर्म संसदेचे आयोजन करण्यात आले आहे. याचे आयोजन सेक्टर १७, शांती सेवा शिबिर येथे दुपारी १२ वाजल्यापासून करण्यात आले आहे. ही धर्म संसद वाचक देवकीनंदन ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. यंदाच्या संसदेत सनातन बोर्डाची मागणी हा चर्चेचा प्रमुख विषय असणार आहे, ज्यावर देशभरातून आलेले साधू-संत चर्चा करतील. महाकुंभ मेळ्यात धर्म संसदेचे महत्त्व आहे, कारण प्रत्येक कुंभ मेळ्यात याचे आयोजन केले जाते. धर्म संसद म्हणजे नक्की काय? त्याचे स्वरूप कसे असते? त्यात कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा केली जाते? त्याविषयी जाणून घेऊ.
धर्म संसद म्हणजे काय?
धर्म संसदचा शब्दशः अर्थ धार्मिक संसद असा होतो. हे हिंदू धर्मगुरू किंवा संतांचे व्यासपीठ आहे, जिथे धर्मासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या मुद्द्यांवर निर्णय घेतले जातात, धर्माशी निगडीत मुद्द्यांवर विचारविनिमय केला जातो. १९८४ मध्ये नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे विश्व हिंदू परिषदेने (व्हीएचपी) पहिली धर्म संसद आयोजित केली होती, जिथे राम जन्मभूमी आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.