Amravati Chai Seller’s Success Story : असं म्हणतात, जर तुम्ही एखाद्या गोष्टीवर मनापासून मेहनत घेतली, तर तुम्ही भरघोस यश मिळवू शकता. आज आपण महाराष्ट्रातील अशा एका व्यक्तीविषयी जाणून घेणार आहोत, ज्यांचे चहाच्या छोट्याशा टपरीमुळे आयुष्य बदलले. महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात राहणार्या अनंत ठाकरे यांनी ५०० रुपये खर्च करून चहाची टपरी सुरू केली होती आणि आता ते लाखो रुपये कमवत आहेत. जाणून घेऊ अनंत ठाकरे यांची संघर्ष कहाणी.
अनंत ठाकरे यांनी नोकरी सोडून व्यवसाय सुरू करण्याचं धाडस दाखवलं. त्यांच्याजवळ शेती नव्हती. कुटुंबाची आर्थिक स्थिती चांगली नव्हती. अनंत हे बी.कॉम.च्या दुसर्या वर्षाला होते, तेव्हा त्यांच्यावर घरची जबाबदारी आली. त्यामुळे त्यांना शिक्षण सोडावे लागले; पण त्यांनी हार मानली नाही. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्यांनी नोकरीसुद्धा केली. खासगी नोकरीमध्ये त्यांना १२ ते १३ तास काम करावे लागायचे. त्यामुळे ते दुसरे काम करू शकत नव्हते. त्यांना पगारसुद्धा खूप कमी होता, जो घरखर्च आणि मुलांच्या शिक्षणासाठी पुरेसा नव्हता. पुढे त्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला.