काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना सोडवायची होती म्हणून उठाव केला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना फुटली नसती, असं विधान करून एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा शिवसेना बंडाच्या वादाला तोंड फोडलं आहे. त्यांच्या या टीकेवर शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत चोख प्रत्युत्तर दिलंय. ते आज ज्या नेत्यांकडून सत्कार स्वीकारत आहेत, त्यांनीच एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाला विरोध केला होता, असा दावा संजय राऊतांनी केलाय. ते आज माध्यमांशी बोलत होते.
एकनाथ शिंदे काय म्हणाले होते?
“खरा वाघ कोण असेल तर त्यांचं नाव बाळासाहेब ठाकरे. त्यांचाच चेला हा एकनाथ शिंदे आहे. शब्द दिला तर दहावेळा विचार करतो. शिवसेना वाचवण्यासाठी, शिवधनुष्यबाण वाचवण्यासाठी, काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना सोडवण्यासाठी हे (शिवसेनेत बंड पुकारलं) केलं. बाळासाहेब म्हणायचे की शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही. रामदास कदम म्हणाले त्याप्रमाणे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते तर हा पक्ष फुटला नसता”, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.