“संस्कारांचा सुगंध दरवळलेला साक्षगंध” – वैष्णवी व आदित्यच्या सोहळ्यातून समाजाला नवा मार्ग

0
72

मूर्तिजापूर :

मूर्तिजापूरातील प्रख्यात व प्रतिष्ठित किडे कुटुंबातील श्री. संजयजी किडे यांची कन्या वैष्णवी किडे हिचा साक्षगंध सोहळा नुकताच भगवंत लॉन गोयंका नगर मुर्तिजापूर येथे अत्यंत दिमाखदार, सुसंस्कृत व सामाजिक भान जागवणाऱ्या पद्धतीने संपन्न झाला.या सोहळ्याची शोभा वाढवण्यासाठी अकोला पश्चिमचे कार्यक्षम कर्तव्यदक्ष आमदार मा. रंधीरभाऊ सावरकर आणि उदयोन्मुख, लोकाभिमुख मुर्तिजापूरचे आमदार मा. हरीशभाऊ पिंपळे विशेष उपस्थित होते.

या साक्षगंध सोहळ्याचे केंद्रबिंदू ठरले दोन अनोख्या आणि मनस्पर्शी संकल्पना:

1. बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘स्मृती कक्ष’, जिथे बोरकुट, पेपरमिंट गोळ्या, हाजमोळा, तांबूल, फ्रुट्स बॉल असे खाऊ ठेवण्यात आले होते. या कक्षात ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या लहानपणाचा अनुभव पुन्हा जगता आला, तर लहानग्यांनी तो इतिहास म्हणून अनुभवला. अनेकांच्या डोळ्यांत आठवणींचे अश्रू उभे राहिले.

2. १०० मित्र झाडांची लागवडीचा संकल्प— फ्रेंडशिप डे च्या निमित्ताने भविष्यातील वधूवर वैष्णवी आणि आदित्य यांनी ही संकल्पना हाती घेतली, जी पर्यावरण रक्षणाचा आणि सामाजिक भानाचा अद्वितीय आदर्श ठरली.

या बालपणीच्या चवश्रेष्ठी चा उजाळा देणारा काउंटर आणि झाडे लावण्याची संकल्पना ही श्री. वैभव किडे यांची होती.हा प्रयोग नक्कीच यशस्वी व्हावा आणि येत्या पिढीत साक्षगंध सोहळा ‘संस्कारगंध’ सोहळा व्हावा, ही अपेक्षा बाळगून एक सामाजिक प्रयोग म्हणून ही साकपणा ठेवण्यात आली.

मान्यवरांचे प्रेरणादायी विचार :

आ. रंधीरभाऊ सावरकर यांचे विचार :

“आजचा हा साक्षगंध सोहळा केवळ एक कौटुंबिक विधी न राहता, तो समाजमनाला स्पर्श करणारा जनजागृतीचा एक विलोभनीय दीपस्तंभ ठरला आहे. वैष्णवी आणि आदित्य या नवयुगलाने जो वृक्षलागवडीचा संकल्प केला आहे, तो केवळ नैसर्गिक समृद्धीचा नव्हे तर त्यांच्या वैवाहिक जीवनातील समरसतेचा आणि शाश्वततेचा शिलालेख ठरेल. अशा चैतन्यमय सोहळ्यांतूनच संस्कृतीचा खरा गंध दरवळतो.”

आ. हरीशभाऊ पिंपळे यांचा मनातील शब्द :

“हा साक्षगंध सोहळा म्हणजे केवळ मंगल कलशांचा अथवा सप्तपदीचा उत्सव नाही, तर हा सोहळा म्हणजे आपल्या पुढील पिढीसाठी एक सामाजिक संकल्पयज्ञ आहे. जुन्या आठवणींना साजेसा ‘स्मृती कक्ष’ हा केवळ कल्पकतेचा नव्हे, तर सामाजिक आत्मीयतेचा कळस आहे. अशी दृष्टी, अशी जाण आणि असा व्यापक विचार करणारे कुटुंब म्हणजेच खरे समाजाचे दीपस्तंभ असतात.”

हा साक्षगंध सोहळा एका नवीन परंपरेचा प्रारंभ ठरला. ‘आदर्श साक्षगंध’ न राहता, ‘संस्कारगंध’ बनलेल्या या सोहळ्याची चर्चा संपूर्ण परिसरात गाजत आहे. हा एक असा संस्कारप्रेरित सोहळा होता, ज्यातून येणाऱ्या पिढ्यांना जबाबदारी, पर्यावरणप्रेम आणि आपुलकी याचे बळ लाभेल.

कुटुंबाच्या कल्पकतेला, मान्यवरांच्या उपस्थितीला आणि समाजाच्या भरभरून प्रतिसादाला सलाम करत हा सोहळा खरंच एक “आदर्श सामाजिक प्रयोग” ठरला आहे.