
अकोला, दि. ७ ऑगस्ट – शहरातील रामनगर म्हाडा कॉलनी परिसरात आज रात्री ८ वाजता ‘साळीदर’ (इंग्रजीत: Porcupine) हा दुर्मिळ काटेधारी वन्य प्राणी आढळून आला असून, त्यामुळे परिसरात काही काळ खळबळ निर्माण झाली. हा दुर्मिळ प्राणी प्रथम सुमित पुरी यांना त्यांचा कुत्रा फिरवताना काही नागरिकांनी दाखवला. त्यानंतर त्यांनी आपला कुत्रा घरी नेला व तातडीने त्या प्राण्याच्या मागावर गेले. ही माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली व प्राणी पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र अंधाराचा फायदा घेत साळीदर सुळसुळीत निसटून गेला. ‘साळीदर’ सामान्यतः जंगलामध्ये आढळतो. त्याच्या अंगावर असलेले तीव्र काटे त्याच्या सुरक्षेसाठी कवचासारखे कार्य करतात, त्यामुळे तो सहजासहजी कोणालाही जेरबंद होत नाही. हा प्राणी मानवास अपाय करत नाही, मात्र तो स्वतःच्या संरक्षणासाठी आक्रमक होऊ शकतो. वनविभागाने परिसरात सतत नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांनी अशा दुर्मिळ प्राण्यांची माहिती मिळाल्यास घाबरून न जाता तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.