– आमदार संजय खोडके
संपूर्णत: अभियानाचा सन्मान सोहळा


अमरावती, दि. 8 (जिमाका) : मेळघाटमध्ये काम करणे आजही आव्हानात्मक आहे. निती आयोगाच्या सहकार्याने आकांक्षित भागाच्या विकासासाठी महत्वपूर्ण कार्य करण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासनाने शेवटच्या घटकाला न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन आमदार संजय खोडके यांनी केले.
जिल्हा नियोजन सभागृहात संपूर्णत: अभियान सन्मान सोहळा पार पडला. यावेळी आमदार प्रविण तायडे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, विभागीय महिला व बालविकास अधिकारी विलास मसराळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते आदी उपस्थित होते.
आमदार श्री. खोडके यांनी, जिल्ह्याच्या विकासासाठी प्रत्येक नागरिकापर्यंत योजना पोहोचविण्यात यावी. सर्व नागरिकांपर्यंत लाभ पोहोचावा यासाठी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावे. या केलेल्या कामाचे मुल्यमापन झाल्याने अधिकारी, कर्मचारी यांचा सत्कार करण्यात येत आहे. शासकीय योजनांची मदत केल्याने नागरिकांचे दारिद्र्य कमी करण्यास मदत होणार आहे. मागासलेल्या भागांमध्ये शाळा सुटल्याने बालविवाह होत आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने या क्षेत्रावर लक्ष ठेवून वेळीच कार्यवाही करावी. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कृषी विभागाने नवीन योजना हाती घ्याव्यात. शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी एकाच ठिकाणी विक्रीची व्यवस्था उभारल्यास फायदा होऊ शकेल, असे सांगितले.
आमदार श्री. तायडे यांनी, समाजाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रित कार्य करावे. समस्या घेऊन आलेल्या नागरिकांचे समाधान झाल्यास लोकप्रतिनिधींकडे येणाऱ्या तक्रारी होईल. सक्रीयपणे समस्यांवर काम केल्यास नागरिकांचे समाधान होण्यास मदत होईल, असे सांगितले.
जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी आकांक्षित तालुक्यात आरोग्य, माती परिक्षण, दळणवळण या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य झाले आहे. केवळ उद्दीष्ट गाठण्यापेक्षा परिणाम होईल, असे कार्य होणे आवश्यक आहे. मेळघाटातील बालमृत्यू नियंत्रणात असला तरी मातामृत्यू रोखण्यासाठी अल्पवयात होणारे विवाह रोखणे गरजेचे आहे. कमी वयात गर्भधारणा राहू नये, तसेच दोन मुलांमध्ये अंतर राखण्याबाबत जनजागृती करावी. येत्या काळात या सर्व क्षेत्रात कार्य करून जिल्ह्याचा विकास घडवून आणण्यात येईल.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती महापात्र यांनी, मेळघाटात कर्मचारी विपरीत परिस्थितीत कार्य करीत असल्याची जाणीव आहे. प्रशासन ही जनतेची सेवा असल्याने प्रत्येकाने प्रामाणिकपणे कार्य करावे. गरजू नागरिकांपर्यंत पोहोचून केवळ आपला परिसर बदलण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन केले.
यावेळी धारणी आणि चिखलदरा तालुक्यातील आरोग्य विभाग, तहसिल कार्यालय, पंचायत समिती, कृषी विभाग, जिल्हा परिषद, जिल्हा नियोजन विभाग, तालुका कृषी कार्यालय, बाल विकास कार्यालय, राष्ट्रीय जीवनोन्नती अभियान, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, गटशिक्षणाधिकारी यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. चिखलदऱ्याचे गटविकास अधिकारी विनोद खेडकर यांनी आभार मानले
