
मूर्तिजापूर, (दिनांक ८ ऑगस्ट २०२५): मूर्तिजापूर शहरात ठिकठिकाणी साचलेल्या कचऱ्यामुळे आणि गटारींच्या दुरवस्थेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विशेषतः जुनी वस्ती, रोशनपुरा परिसरात पावसाच्या पाण्यामुळे गटारीतील घाण रस्त्यावर आल्याने संपूर्ण भागात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे ही समस्या वाढत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.शहरभर अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. यामुळे दुर्गंधी पसरत असून, डासांचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे साथीचे रोग पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. रोशनपुरा भागात काल झालेल्या पावसामुळे गटारी तुंबल्या आणि त्यातील कचरा व घाण रस्त्यावर पसरली. त्यामुळे रहिवाशांना याच घाणीतून ये-जा करावी लागत आहे. यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य गंभीर धोक्यात आले आहे.या गंभीर समस्येकडे नगरपरिषद प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तसेच, स्वच्छतेचे काम करणाऱ्या ठेकेदारांवरही कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. नागरिकांनी प्रशासनाला या समस्येची गंभीर दखल घेऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. अन्यथा, शहरात आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊन मोठी समस्या उद्भवू शकते, अशी भीतीही व्यक्त होत आहे.