
मूर्तिजापूर शहर: शहरातील परदेशीपुरा भागात अवैधरित्या गोमांस बाळगल्याच्या आरोपाखाली तीन तरुणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी छापा टाकून सुमारे ८० किलो गोमांस आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेले साहित्य जप्त केले आहे.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, १० ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १ ते २ वाजेच्या सुमारास पोलिसांनी परदेशीपुरा येथील अब्दुल जाफर याच्या घरावर छापा टाकला. या छाप्यात, पोलिसांनी दोन पंचांसमक्ष ८० किलो गोमांस, तीन लोखंडी सुरी, लाकडी ओंडके, वजनकाटा आणि एक किलोचे वजन असे एकूण सुमारे २४,७५० रुपयांचे साहित्य जप्त केले.
या प्रकरणी, अब्दुल जाफर अब्दुल हन्नान (वय २३), अब्दुल इरफान अब्दुल हन्नान (वय २५), आणि अब्दुल सुलतान अब्दुल हन्नान (वय २२) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम आणि बीएनएसच्या संबंधित कलमांनुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार सुरेश पांडे करत आहेत.
