*आठ दुकानातील नमुन्यांचे संकलन

अमरावती, दि. 11(जिमाका): राज्यात सणासुदीच्या दिवसांमध्ये अन्नसुरक्षेची खात्री करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडून विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. ही मोहीम अन्न व औषध प्रशासन मंत्री यांच्या निर्देशानुसार राबवली जात आहे. यात आठ दुकांनामधील अन्न नमुने घेण्यात आले आहे.जिल्हाधिकारी कार्यालय, मनपा आयुक्त, आणि जिल्हा दूध समिती अमरावतीच्या सदस्यांसमवेत शहरातील रघुवीर मिठाईया, सातूर्णा, अमरावती, तसेच वैष्णवी फुड प्रॉडक्ट्स, राजापेठ, बडनेरा रोड येथील मिठाई उत्पादक आस्थापनांच्या अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत तपासणी करण्यात आली. तसेच मिठाई आणि इतर अन्नपदार्थांचे एकूण आठ नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले आहेत.या कारवाईमध्ये अन्न व औषध प्रशासन, जिल्हा दुग्ध विकास विभाग, जिल्हा पशुसंवर्धन विभाग आणि पोलीस विभागाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. ही कारवाई सह आयुक्त स. द. केदारे आणि सहायक आयुक्त भा. कि. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यात अन्न सुरक्षा अधिकारी गजानन गोरे, घ. प. दंदे, दुग्ध विकास विभागाचे विनोद पाठक, उपायुक्त डॉ. संजय कावरे आणि पशुधन विकास अधिकारी डॉ. तुषार गावंडे यांचा सहभाग होता.ही विशेष मोहीम ऑगस्ट ते डिसेंबर 2025 दरम्यान सातत्याने राबवली जाणार आहे. सर्व अन्न व्यावसायिकांनी अन्नपदार्थ तयार करताना योग्य स्वच्छता आणि शुद्धतेची काळजी घ्यावी. तसेच, ग्राहकांनी दुग्धजन्य पदार्थांची साठवणूक फ्रिजमध्ये करावी आणि 24 तासांच्या आत त्यांचे सेवन करावे, असे आवाहन सहायक आयुक्त भा. कि. चव्हाण यांनी केले आहे.
