
मूर्तीजापूर (प्रतिनिधी) – मूर्तीजापूर येथील मुर्तीजापुर शहर पोलीस स्टेशन बाहेर दुचाकी आणि इतर वाहनांसाठी नंबर प्लेट लावण्यासाठी नियमांचे उल्लंघन होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरटीओच्या नियमांनुसार दुचाकीसाठी ₹५३१ आणि इतर वाहनांसाठी थोडे अधिक शुल्क आकारले जाते, मात्र एजंट आणि संबंधित व्यक्ती याच्या दुप्पट, म्हणजेच ₹९०० ते ₹१००० रुपये वसूल करत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. विशेष म्हणजे, नंबर प्लेट लावण्याचे अतिरिक्त १०० रुपयेही घेतले जात आहेत. हे सर्व सर्रासपणे पोलीस ठाण्यासमोरच घडत असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या मनमानी कारभारामुळे सर्वसामान्य नागरिक आणि गरिबांची आर्थिक पिळवणूक होत आहे. अनेक गरजू लोक मोठ्या कष्टाने पैसे जमवून गाडी घेतात, पण त्यांना नंबर प्लेटसाठी दुप्पट पैसे मोजावे लागत आहेत. शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त रक्कम घेणे हा एक प्रकारे भ्रष्टाचारच आहे. या गंभीर प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
या प्रकरणाची दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष घालून या लुटीला आळा घालावा, जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळेल.