
मुर्तीजापूर: मुर्तिजापूर शहरातील नागरिकांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत असून, येथील नगरपरिषदेला कायमस्वरूपी मुख्य अधिकारी नसल्याने शहरवासीयांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. नगरपरिषद केवळ नावापुरतीच उरली असून, ती अक्षरशः ठेकेदार आणि कर्मचाऱ्यांच्या अड्ड्यात रूपांतरित झाल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे.
*कायमस्वरूपी अधिकारी नाही, म्हणून कामांचा खोळंबा*
गेल्या अनेक महिन्यांपासून मुर्तिजापूर नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांचे पद रिक्त आहे किंवा प्रभारी अधिकाऱ्यांच्या हाती आहे. प्रभारी अधिकारी असल्याने शहराच्या विकासाची कामे, नागरिकांच्या समस्या सोडवणे आणि प्रशासनावर नियंत्रण ठेवणे याकडे दुर्लक्ष होत आहे. अनेक महत्त्वाच्या फायली आणि निर्णय प्रलंबित राहिल्याने विकासकामांचा वेग मंदावला आहे.कर्मचारी आणि ठेकेदारांचा मनमानी कारभारमुख्य अधिकारी नसल्याचा फायदा घेत नगरपरिषदेतील कर्मचारीही मनमानी करत आहेत. ते कार्यालयात वेळेवर उपस्थित नसतात, कामांबाबत टाळाटाळ करतात आणि नागरिकांना योग्य प्रतिसाद देत नाहीत. यामुळे, जन्म-मृत्यू दाखले, पाणीपट्टी, बांधकाम परवानगी अशा कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना तासन्तास वाट पाहावी लागते. याशिवाय, ठेकेदारांचाही सुळसुळाट वाढला असून, कामांचा दर्जा, बिलांची मंजुरी यांवर कुणाचेही नियंत्रण राहिले नसल्याचे दिसत आहे.
*नागरिकांची मागणी, राजकीय दबाव असल्याची चर्चा*
या गंभीर परिस्थितीमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी अनेकदा आवाज उठवला आहे. काही स्थानिक नेत्यांनी तर अकोला जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन देऊन तातडीने कायमस्वरूपी मुख्य अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने याकडे लक्ष न दिल्यास आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणामागे राजकीय दबाव असल्याचीही कुजबूज सुरू आहे, ज्यामुळे जिल्हाधिकारी यावर निर्णय घेण्यास टाळाटाळ करत आहेत अशी चर्चा आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरजमुर्तिजापूर शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष घालणे गरजेचे आहे. कायमस्वरूपी आणि कार्यक्षम मुख्य अधिकाऱ्याची नियुक्ती झाल्यासच शहरातील प्रशासकीय व्यवस्था सुरळीत होईल आणि नागरिकांना दिलासा मिळेल.
