
अमरावती प्रतिनिधी दिपक अजबराव खडसे , दि. 29 (जिमाका) : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ साजरा करण्यात आला. यानिमित्ताने आज मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात पार पडली.खासदार डॉ. अनिल बोंडे आणि आमदार संजय खोडके यांच्या हस्ते क्रिडा दिनाचे उद्घाटन झाले. यावेळी शिवछत्रपती पुरस्कार विजेते डॉ. नितीन चव्हाळ आणि जिल्हा शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेचे अध्यक्ष अजय आळशी उपस्थित होते. डॉ. अनिल बोंडे आणि आमदार संजय खोडके यांनी मेजन ध्यानचंद यांच्या जीवनपैलू वर प्रकाश टाकला. तसेच ‘फिट इंडिया’ पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन केले.राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या तिनशेव्या जयंतीनिमित्त क्रीडा आणि खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी मॅरेथॉन स्पर्धा पार पडली. मॅरेथॉन स्पर्धेत पुरुषांमध्ये प्रथम उजेर खान, द्वितीय प्रतिक गेडाम आणि तृतीय गौरव इंगळे यांनी रोख बक्षीस पटकाविले. महिलांमध्ये प्रथम वैष्णवी वानखडे, द्वितीय पायल मगरदे आणि तृतीय गायत्री बेहरे क्रमांक पटकाविला. त्यांना रोख बक्षीस, पदके आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी ‘एक घंटा खेल के मैदान मे’, ‘खेलेगा छात्र तो खेलेगा राष्ट्र’, आणि ‘खेले भी खिले भी’ असे नारे देण्यात आले. सहभागी खेळाडू, नागरिक आणि प्रशिक्षकांनी क्रीडा दिनानिमित्त शपथ घेतली. पोलीस विभागाने वाहतूक आणि पोलीस बंदोबस्त पुरवून सहकार्य केले. संदीप इंगोले आणि अतुल पाटील यांनी सूत्रसंचालन केले. त्रिवेणी बांते यांनी आभार मानले.खेलो इंडिया सेंटरच्या वतीने धनुर्विद्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय क्रिडा दिनानिमित्त दि. 29 ते 31 ऑगस्ट दरम्यान विविध क्रिडा स्पर्धा घेण्यात येणार आहे. यात खेळाडूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रिडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले. कार्यक्रमासाठी जिल्हा क्रिडा अधिकारी गणेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष विघ्ने, वैशाली इंगळे, स्वप्नील चांदेकर, राहुल निवडंगे, प्रफुल्ल डांगे, रितेश अनंतवार, धनंजय भारसाकडे, अकिल शेख, राजपाल इंगळे, अमोल लांडे यांनी पुढाकार घेतला.