
मूर्तिजापूर: राष्ट्रीय महामार्ग ५३ वरील नागोली फाट्याजवळ शुक्रवारी (१९ सप्टेंबर) दुपारी एक भरधाव एसटी बसने होंडा सिविक कारला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून कारमधील एका मित्राला गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणी मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये एसटी बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जळगाव जामोद येथील रहिवासी सचिन शंकर मानकर (वय ३१) हे आपल्या होंडा सिविक कारने (क्र. एमएच ०२ बी.वाय ८८७८) अमरावतीहून जळगाव जामोदकडे जात होते. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास नागोली फाट्याजवळ त्यांच्या कारला वर्धा जिल्ह्यातील वाई गावाचा रहिवासी असलेल्या वसंत नारायणराव पेदाम (वय अंदाजे ४०) यांनी चालवत असलेल्या एमएच १४ एमएच ००९४ क्रमांकाच्या एसटी बसने मागून धडक दिली.हा अपघात एसटी बस चालकाच्या निष्काळजीपणामुळे झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अपघातामुळे कारचे मोठे नुकसान झाले असून, सचिन मानकर यांच्या मित्राला डोक्याला आणि पाठीला मार लागला आहे.या घटनेची तक्रार सचिन मानकर यांनी रात्री ९:५२ वाजता मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपी बस चालक वसंत पेदाम यांच्या विरोधात भादंविच्या कलम २७९, ३३७ आणि ४२७ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रमोद नवलकार करत आहेत.








