
मूर्तिजापूर (अकोला): स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची शक्यता वर्तवली जात असतानाच, मूर्तिजापूर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी तयारीला वेग आला आहे. दिनांक ६ सप्टेंबर रोजी नगराध्यक्षपदासाठी आरक्षण जाहीर झाल्यानंतर, ‘सर्वसाधारण (खुला)’ वर्गासाठी हे पद राखीव ठेवण्यात आले होते. यानंतर आज, दिनांक ८ ऑक्टोबर २०२५ रोजी नगरपालिकेच्या प्रभागनिहाय (वार्डनिहाय) आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली आहे.प्रभाग रचना आणि महिलांना संधी:शहर पातळीवर एकूण १२ प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत. यापैकी प्रभाग क्र. १ ते ११ मध्ये ‘अ’ आणि ‘ब’ असे प्रत्येकी दोन उमेदवार तर प्रभाग क्र. १२ मध्ये तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असतील. या आरक्षण सोडतीमध्ये महिला उमेदवारांना मोठ्या प्रमाणात संधी मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे निवडणुकीतील चुरस वाढणार असून, अनेक प्रभागांमध्ये तुल्यबळ लढती पाहायला मिळण्याची शक्यता आहे. *जनतेच्या मनात काय?.* सध्या शहरात निवडणुकीच्या वातावरणासोबतच माजी नगरसेवकांच्या कार्यावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सामान्य नागरिकांमध्ये एक तीव्र नाराजी आणि बदल करण्याची मानसिकता दिसून येत आहे. नागरिकांमध्ये अशी चर्चा आहे की, मागील कार्यकाळात ज्या नगरसेवकांनी फक्त निवडणुकीपुरतेच काम केले, निवडणुकीनंतर मतदारांकडे पाठ फिरवली किंवा आपल्या प्रभागाच्या मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष केले, अशा ‘निव्वळ नावापुरत्या’ नगरसेवकांना यावेळी नागरिक निवडणुकीतून त्यांची ‘जागा’ नक्कीच दाखवतील.जनतेचा कौल त्याच उमेदवाराला मिळणार, जो प्रत्यक्षात लोकांसाठी उभा राहील आणि प्रामाणिकपणे काम करेल. मतदारांनी आता निव्वळ पक्षाऐवजी उमेदवाराचे कार्य आणि निष्ठा यावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे, आगामी निवडणुकीत कोणत्या पक्षाला जनतेचा कौल मिळतो, यापेक्षा जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणारे किती नवीन चेहरे निवडून येतात आणि माजी नगरसेवकांपैकी कोणाला पुन्हा संधी मिळते, हे पाहणे सर्वात अधिक उत्सुकतेचे ठरणार आहे.