मूर्तिजापूर- दर्यापूर मार्गावर पायटांगी फाट्याजवळ ट्रॅक्टर-रिक्षा-कारची धडक; ऑटोचालकाचा जागीच मृत्यू, माजी नगरसेवकाच्या पत्नीसह ९ जखमी; ३ लहान मुलांचा समावेश.

0
12

मूर्तिजापूर (जि. अकोला): मूर्तिजापूर- दर्यापूर मार्गावरील पायटांगी फाट्याजवळ आज (गुरुवार) संध्याकाळी साडेसातच्या सुमारास झालेल्या भीषण तिहेरी अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून, माजी नगरसेवकांच्या पत्नीसह अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. ट्रॅक्टर, ऑटो रिक्षा आणि कार यांच्यामध्ये झालेल्या जोरदार धडकेमुळे हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

अपघाताची तीव्रता एवढी जबरदस्त होती की, ऑटो रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातात ऑटो रिक्षा चालक जागेवरच ठार झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मृतांमध्ये चालकाचा समावेश आहे. अपघाताचा फटका ऑटोमध्ये बसलेल्या प्रवाशांनाही बसला असून, ते टाकरखेडा मोरे आणि लोणी गावातील रहिवासी असल्याची माहिती आहे.

या अपघातात मूर्तिजापूरचे माजी नगरसेवक संदीप जळमकर यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या आहेत. त्या कारने आपल्या माहेरी सांगवी येथे जात असताना हा अपघात घडला. त्यांना पुढील उपचारासाठी तातडीने अकोला येथे हलवण्यात आले आहे. इतर जखमींवर मूर्तिजापूर येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

साक्षीदारांच्या माहितीनुसार, या धडकेत ऑटो रिक्षा चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून, काही प्रवासी गंभीर जखमी तर सात ते आठ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. या जखमींमध्ये तीन लहान मुलांचाही समावेश असल्याचे समजते.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त वाहने बाजूला केली. यामुळे काही काळ विस्कळीत झालेली वाहतूक पूर्ववत करण्यात आली. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही, परंतु प्राथमिक अंदाजानुसार अंधार आणि वाहनांचा भरधाव वेग हे घटक अपघातासाठी कारणीभूत ठरले असावेत, अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here