
शासन निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी न झाल्यास युवासेनेचा आंदोलनाचा इशारा]यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी / नरेश राऊत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शाळा प्रशासनाकडून आणि बस कंत्राटदारांकडून नियमांची पायमल्ली होत असल्याचा आरोप करत, युवासेनेने आज आक्रमक पवित्रा घेतला. “विद्यार्थ्यांच्या जीवाशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही,” असा इशारा देत युवासेना विधानसभा प्रमुख ॲड .योगेश ठाकरे , युवासेनेचे तालुकाध्यक्ष मयूर जुमळे यांनी प्रशासनाला धारेवर धरले. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दिनांक १३ मे २०२५ रोजी सर्व शाळा व स्कूल बसमध्ये सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविणे बंधनकारक करणारा शासन निर्णय जारी केला आहे. मात्र राळेगाव तालुका व शहरातील अनेक शाळांच्या बसमध्ये आजही सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविलेले नाहीत किंवा ते कार्यरत नसल्याचे चित्र असून , ही बाब शासन निर्णयाची थेट पायमल्ली आहे.युवासेना तालुका राळेगाव यांच्या वतीने यासंदर्भात आज मा.उपविभागीय अधिकारी साहेब राळेगाव व गटशिक्षण अधिकारी, पंचायत समिती राळेगाव यांना निवेदन देऊन प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे. सी.सी.टी.व्ही. अभावी दररोज प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, एखादी अनुचित घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित शाळा व्यवस्थापन व प्रशासनावर राहील, असा स्पष्ट इशारा युवासेनेने दिला आहे. शासन निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करून सर्व स्कूल बसची तपासणी करावी, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळा व्यवस्थापन, बस मालक व चालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कठोर कारवाई करावी तसेच सी.सी.टी.व्ही. बसविण्यासाठी ठोस कालमर्यादा निश्चित करून त्याची सक्तीने अंमलबजावणी करावी, अशी ठाम भूमिका युवासेनेने मांडली आहे. प्रशासनाने या विषयावर वेळकाढूपणा केल्यास विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी युवासेना तालुका राळेगाव रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन, मोर्चा व निषेध आंदोलन करेल याची प्रशासनाने गंभीर नोंद घ्यावी. विद्यार्थ्यांची सुरक्षितता हा अत्यंत संवेदनशील विषय असून , शासन निर्णयाची अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी, अशी जोरदार मागणी युवासेना तालुका राळेगाव यांच्या वतीने निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. यावेळी अॅड.योगेश ठाकरे युवासेना विधानसभा अध्यक्ष राळेगाव विधानसभा , मयूर जुमळे तालुका प्रमुख युवासेना राळेगाव , सागर वर्मा , महेश राउत , जगदीश निखोडे , कार्तिक कायवलकर , सुजल मेश्राम , ध्रुप राउत , प्रणय भुडे , गौरव वाघाडे , निखील कोवे , चेतन वैद्य ,महेश जुमनाके , गीतेश अलबनकर , समीर येरेकार , युवराज चटकी , गजानन बुठे ,अक्षय भोकटे आदी युवासेनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.





