
,भद्रावती. स्वच्छ व सुंदर शहरीकरणास प्राधान्य देत भद्रावती नगर परिषदेने काही वर्षापूर्वी प्रभागातील मोकळ्या जागेवर लहान उद्यान निर्मितीसह खेळणी साहित्य व ग्रीन जीम साहित्य मोठा गाजावाजा करून बसविण्याचा सपाटा लावला होता. नागरिकांच्या कराचा कुठेतरी सदुपयोग होत असल्याचा प्रत्यय दिसू लागला होता. अवघे नवलाईचे नऊ दिवस संपताच बऱ्याच वॉर्डातील या साहित्यांची नगर परिषदेने व परिसरातील नागरिकांनी योग्य देखभाल व निगा न राखल्याने भद्रावती शहरातील हे साहित्य मोडकळीस येऊन धूळखात पडल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.नागरिक व लहान मुलांना विरंगुळा म्हणून उपलब्ध करुन देण्यात आलेल्या लाखो रुपयांच्या साहित्याची व खर्च झालेल्या निधीच अस विडंबन गंभीर बाब आहे.सौंदरीकरण करण्यात आलेली अनेक ठिकाणे प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे झाडे झुडपे वाढून भयाण होत असताना सबंधित यंत्रणेला जाग न येणे चिंतनीय बाब आहे. शहरातील केवळ एकच नव्हे तर चौदा हि प्रभागात क्रीडा व खेळणी साहित्याची अक्षरशः प्रचंड दुरावस्था होणे हि शोकांतिका आहे.नवनिर्वाचित सदस्यांसह तरुण व पालिकेचा अनुभव असणारे नगराध्यक्ष प्रफुल्ल चटकी यांना पूर्वीच्या प्रलंबित व पुढील नियोजित कामासह शहराच्या विद्रुपीकरणास जबाबदार घटकावर सुद्धा अंकुश निर्माण करण्याची जबाबदारी पार पाडावी लागेल







