
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी / नरेश राऊत यवतमाळ जिल्ह्यात वाढत चाललेल्या आंतरराज्यीय अवैध गुटखा तस्करीवर स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी मोठी आणि निर्णायक कारवाई केली आहे. या कारवाईत तेलंगणा राज्यातून महाराष्ट्रात बंदी असलेला सुगंधित पानमसाला व तंबाखू वाहतूक करणाऱ्या दोन इसमांना ताब्यात घेऊन तब्बल ६५ लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यवतमाळ जिल्ह्यात अवैध गुटखा, पानमसाला व तंबाखूची वाहतूक व विक्री रोखण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक, यवतमाळ यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ व पांढरकवडा-वणी उपविभागातील अधिकारी व अमलदार सतर्क होते. दिनांक २७ डिसेंबर २०२५ रोजी खास खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की तेलंगणा राज्यातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ मार्गे एका आयशर वाहनातून मोठ्या प्रमाणात बंदी असलेला पानमसाला व तंबाखू पांढरकवडाकडे वाहतूक केली जात आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे क्षणाचाही विलंब न करता दोन पंचांसह महामार्ग क्रमांक ४४ वरील ढोकी गावाजवळ सापळा रचण्यात आला. संशयित आयशर वाहन क्रमांक UP-94-AT-2305 थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये ‘सागर पानमसाला’ व ‘SR-1 Sended Tobacco’ असा बंदी घातलेला माल मोठ्या प्रमाणात आढळून आला. वाहन चालक मोहन सियाराम यादव (वय २६, रा. पिचोड, जिल्हा शिवपुरी, मध्यप्रदेश) व क्लिनर बुध्दा बाबुसिंग परीयार (वय ३५, रा. अमोला थाना, तहसील घसारी, जिल्हा शिवपुरी, मध्यप्रदेश) यांना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत १८० पोते सुगंधित पानमसाला व तंबाखू (किंमत ४५,९२,००० रुपये), एक मोबाईल (किंमत अंदाजे ६,००० रुपये) तसेच आयशर वाहन (किंमत अंदाजे २०,००,००० रुपये) असा एकूण ६५,९८,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिता, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता पेंडकर, धनराज हाके, गजानन राजामलू तसेच स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व अमलदारांनी यशस्वीरीत्या पार पाडली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस स्टेशन पांढरकवडा येथे सुरू असून अवैध गुटखा तस्करीच्या साखळीचा छडा लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत.






