मूर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालयात गोरगरीब रुग्णांची परवड; “सिरीयस असाल तरच या” म्हणत डॉक्टर राठोड यांनी झटकले हात!

Jwaladeep News

January 12, 2026

मूर्तिजापूर (प्रतिनिधी):येथील राणी लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय हे तालुक्यातील गोरगरीब रुग्णांसाठी आधारवड मानले जाते. मात्र, सध्या या रुग्णालयात कार्यरत असलेल्या काही डॉक्टरांच्या मनमानी कारभारामुळे रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. “तुम्ही सिरीयस नाही, सकाळी या” असे सांगून रुग्णांना रात्रीच्या वेळी उपचार नाकारले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, यामुळे रुग्णांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याची चर्चा नागरिक करत आहेत.डॉक्टरांची भूमिका संशयाच्या भोऱ्यातकाल रात्री एका नागरिकाने आपल्या आजारी रुग्णाला उपचारासाठी नेले असता, तिथे कार्यरत असलेल्या डॉक्टर राठोड यांनी त्यांना तपासून उपचार देण्याऐवजी वादावादी केली. “तुम्ही आता सिरीयस दिसत नाही, उद्या सकाळी या; इथे फक्त इमर्जन्सी पेशंटच घेतले जातात,” असे म्हणत त्यांनी रुग्णाला ॲडमिट करून घेण्यास स्पष्ट नकार दिला. डॉक्टरांच्या या उद्धट आणि बेजबाबदार वर्तनामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे.

गोरगरिबांनी रात्री-अपरात्री जायचे कुठे?

तालुकास्तरीय रुग्णालय हे २४ तास रुग्णसेवेसाठी सज्ज असणे अपेक्षित आहे. रात्रीच्या वेळी गरिबांकडे खासगी रुग्णालयात जाण्यासाठी पैसे नसतात, म्हणूनच ते सरकारी रुग्णालयाची वाट धरतात. अशा वेळी “सिरीयस झाल्यावर या” असे म्हणणे म्हणजे रुग्णाचा जीव धोक्यात घालण्यासारखेच आहे. उद्या जर अशाच प्रकारे एखाद्या रुग्णाला उपचार नाकारले आणि त्याचा जीव गेला, तर त्याला जबाबदार कोण? असा जळजळीत प्रश्न आता उपस्थित होत आहे.प्रशासकीय दुर्लक्ष आणि ‘अप-डाऊन’चा फटकारुग्णालयातील मुख्य डॉक्टर आणि संबंधित कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहून सेवा देणे गरजेचे असताना, अनेक जण मुख्यालयी राहत नसल्याचे बोलले जाते. यामुळे रात्रीच्या वेळी निर्णय घेणारे जबाबदार अधिकारी उपलब्ध नसतात, ज्याचा फायदा घेऊन ऑन-ड्यूटी डॉक्टर आपली मनमानी करतात.

नागरिकांची आक्रमक मागणी”आज माझ्यासोबत हा प्रकार घडला, पण उद्या कोणत्याही सामान्य नागरिकाला किंवा गोरगरिबाला असा त्रास होऊ नये. दवाखाना हा रुग्णांच्या सेवेसाठी आहे, त्यांना हाकलून देण्यासाठी नाही. कोणत्या पेशंटला कधी उपचार हवेत हे ठरवण्याचा अधिकार डॉक्टरला आहे, पण उपचारच नाकारण्याचा अधिकार त्यांना कुणी दिला?” असा सवाल पीडित नागरिकाने उपस्थित केला आहे.

या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन जिल्हा आरोग्य प्रशासनाने संबंधित डॉक्टरांवर कडक कारवाई करावी आणि रात्रीच्या वेळी येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला सन्मानाने उपचार मिळतील याची खात्री करावी, अशी मागणी मूर्तिजापूर तालुक्यातील जनतेने केली आहे.

Leave a Comment