राज्यातील २८८ विधानसभा निवडणुकांचे निकाल आता हाती येत आहेत. सुरुवातीचे कल पाहता महायुतीला राज्यात मोठं यश मिळताना पाहायला मिळत आहे. दरम्यान, तिसरी आघाडी उघडलेल्या बच्चू कडू यांना पराभवाचा धक्का बसला आहे. बच्चू कडू हे अचलपूर विधानसभा मतदारसंघातून लढत होते.
बच्चू कडू यांनी संभाजी छत्रपती आणि राजू शेट्टी यांच्याशी मिळून तिसरी आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीने आपले उमेदवारही दिले आहेत. त्यामुळे या आघाडीचा काय निकाल लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यावेळी महायुती अचलपूर विधानसभेसाठी प्रवीण वसंतराव तायडे यांना उमेदवारी दिली होती. तर महाविकास आघाडीतील अनिरुधा ऊर्फ बाबलुभाऊ सुभनराव देशमुख यांना उमेदवारी दिली होती. २०१९ च्या विधानसभा निवडणूक निकालात अचलपूरची जागा PHJSPचे बच्चू बाबाराव कडू यांनी जिंकली होती.
बच्चू कडू यांनी १९९९ साली विधानसभेची पहिली निवडणूक अपक्ष म्हणून लढवली. त्यावेळी त्यांचा १३०० मतांनी पराभव झाला होता. त्यांच्या पहिल्या निवडणुकीवेळी त्यांच्या अनेक मित्रांनी घरातील दागिने मोडले. पत्नीचे मंगळसूत्र सुध्दा गहाण ठेवले आणि निधी उभा केला होता. आमदार झाल्यानंतर बच्चू कडू यांनी ‘प्रहार जनशक्ती पक्षा’ या संघटनेची स्थापना केली. अपंग, शेतकरी आणि गरिबांच्या न्याय हक्कासाठी झगडणे हे या संघटनेचे मुख्य उद्दिष्ट्ये आहे. अपंगांच्या प्रत्येक प्रश्नावर ते अधिक आक्रमक होतात. अगदी अधिकाऱ्यांना मारहाण करण्यापर्यंत ते आक्रमक होऊन जातात.