ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यातील दुसर्या दिवसाचा खेळ संपला आहे. सामन्यातील पहिला दिवसाचा खेळ पावसामुळे व्यर्थ गेला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवशी फक्त 13.2 ओव्हरमध्ये 28 धावा केल्या. दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने दिवसाचा खेळ संपेपर्यंत 7 विकेट्स गमावून 377 धावा केल्या. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत पहिल्या डावात 101 षटकांमध्ये 405 धावा केल्या आहेत. ट्रेव्हिस हेड आणि स्टीव्हन स्मिथ या दोघांनी केलेली शतकी खेळी आणि द्विशतकी भागीदामुळे ऑस्ट्रेलियाला 400 पार मजल मारता आली. तर टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराह याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या.
दुसऱ्या दिवसाचा खेळ
नॅथन मॅकस्वीनी आणि उस्मान ख्वाजा या सलामी जोडीने दुसऱ्या दिवासाच्या खेळाला सुरुवात केली. टीम इंडियाने पहिल्या सत्रात अप्रतिम कामगिरी केली. टीम इंडियाने अवघ्या 76 धावा देत विकेट्स घेतल्या आणि पहिलं सत्र आपल्या नावावर केलं. जसप्रीत बुमराहने भारताला पहिले 2 विकेट्स मिळवून दिल्या. बुमराहने उस्मान ख्वाजाला 21 आणि नॅथन मॅकस्वीनीला 9 धावांवर बाद केलं. त्यानंतर नितीश रेड्डी याने मार्नस लबुशने याला 12 धावांवर मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची 3 बाद 75 अशी स्थिती झाली.
चौथ्या विकेटसाठी द्विशतकी भागीदारी
टीम इंडियाने पहिल्या सत्रात धारदार बॉलिंग केल्याने दुसऱ्या सत्रातही तशीच कामगिरी अपेक्षित होती. मात्र ट्रेव्हिस हेड आणि स्टीव्हन स्मिथ यांच्या फलंदाजांसमोर भारतीय गोलंदाज अपयशी ठरले. स्मिथ आणि हेड या जोडीने चौथ्या विकेटसाठी द्विशतकी भागीदारी केली. या दरम्यान दोघांनी वैयक्तिक शतक झळकावलं. ही जोडीने टीम इंडियाला बॅकफुटवर ढकललं. त्यामुळे ही जोडी फोडणं आवश्यक होतं. बुमराहने ही जोडी फोडली. बुमराहने स्टीव्हन स्मिथला 101 धावावंर आऊट केलं. स्मिथचं हे कसोटी कारकीर्दीतील 33 वं, टीम इंडिया विरुद्धचं 10 तर 15 वं आंतरराष्ट्रीय शतक ठरलं. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 303 बॉलमध्ये 241 रन्सची पार्टनरशीप केली.
त्यानंतर जसप्रीत बुमराहने एकाच ओव्हरमध्ये 2 विकेट्स घेत टीम इंडियाला सामन्यात कमबॅक करुन दिलं. बुमराहने मिचेल मार्श आणि ट्रेव्हिस हेड या दोघांना आऊट केलं. मिचेल मार्श याला 5 धावांवर आऊट करत मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर हेडला विकेटकीपर ऋषभ पंतच्या हाती कॅच आऊट केलं. हेडने 160 बॉलमध्ये 18 चौकारांच्या मदतीने 152 धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची स्थिती 6 बाद 327 अशी झाली.
त्यानंतर पॅट कमिन्स आणि एलेक्स कॅरी या दोघांनी सातव्या विकेटसाठी 67 बॉलमध्ये 58 रन्सची पार्टनरशीप केली. त्यानंतर मोहम्मद सिराजने पॅटला 20 धावांवर बाद करत वैयक्तिक पहिली विकेट मिळवली. त्यानंतर दिवसाचा खेळ संपेपर्यंत मिचेल स्टार्क आणि कॅरी या दोघांनी 19 चेंडूत नाबाद 20 धावांची भागीदारी केली आहे. कॅरी 47 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 5 फोरसह 45 रन्सवर नॉट आऊट आहे. तर स्टार्क 7 धावांवर नाबाद आहे.
तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), उस्मान ख्वाजा, नाथन मॅकस्वीनी, मार्नस लाबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नाथन लियोन आणि जोश हेजलवुड.
तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप आणि नीतीश कुमार रेड्डी.