Shivsena UBT: ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांची प्रवेशाची तयारी तर दुसरीकडे भाजपातील नेत्यांची नाराजी; इच्छुकांची रांग असताना प्रवेश का?

0
4

पुणे: महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेला (Shivsena UBT) मोठं खिंडार पडल्याचं चित्र आहे. काही दिवसांवर येवून ठेपलेल्या निवडणुकीआधी पुण्यातील शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena UBT) हे पाच माजी नगरसेवक मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. आज दुपारी एक वाजता पक्षप्रवेशाचा कार्यक्रम भाजप (BJP) पक्ष कार्यालयात पार पडणार आहे, माजी नगरसेवक विशाल धनवडे, बाळासाहेब ओसवाल, पल्लवी जावळे, संगिता ठोसर आणि प्राची आल्हाट हे नगरसेवक शिवबंधन सोडून कमळ हाती घेणार आहेत, एकीकडे पक्षप्रवेश होत असतानाच दुसरीकडे पक्षातील नाराजी समोर येत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश देत असल्याने नाराजीनाट्य सुरू झालं आहे. या पाच माजी नगरसेवकांच्या संबंधित प्रभागातील इच्छुक उमेदवारांवरती सध्या टांगती तलवार उभी राहिली आहे. त्यामुळे इच्छुकांनी नाजारी दर्शवली आहे. (Shivsena UBT)

त्याचबरोबर इच्छुकांनी नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत झोकून काम केलं, त्यानंतर आता महापालिकेसाठी उमेदवारी मिळण्याची आस असतानाच या पाच प्रभागामध्ये नव्याने पक्षप्रवेश झालेल्यांना संधी मिळाली तर पक्षासाठी काम करूनही डच्चू मिळण्याची शक्यता असल्याने इच्छुकांकडून पक्षसंघटनेतील पदाधिकार्‍यांकडे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

संबंधितांना पक्षात घेऊ नये, अशीही मागणी केली जात होती. मात्र, आज या पाच माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश पार पडणार असल्याची माहिती आहे. त्याचबरोबर ठाकरेंच्या पक्षातील या पाच माजी नगरसेवकांना पक्षात घेत असतानाच भाजपमधील काही नेत्यांबरोबरच संघटनेतील नेत्यांनाही विश्वासात घेतले गेलं नसल्याच्या चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. त्यामुळे या राच माजी नगरसेवकांना पक्षात घेण्याबाबत पक्षातच काहींमध्ये नाराजी असल्याची माहिती आहे. त्यामुळे रविवारी होणारा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम लांबल्याच्याही चर्चा आहेत. मात्र, या पाच जणांचा पक्षप्रवेश आज (मंगळवारी दि. 7) मुंबईत भाजप पक्ष कार्यालयात होणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here