Uddhav Thackeray : भाजपाने राजकारणाचा विचका केला अशी बोचरी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. तसंच महाराष्ट्राने आता तयारी केली आहे. प्रचार करा किंवा करु नका महाराष्ट्राने काय करायचं ते ठरवलं आहे आणि २३ तारखेला ते समजणार आहे असं उद्धव ठाकरेंनी ( Uddhav Thackeray ) म्हटलं आहे.
लोकांच्या मनात काय ते २३ नोव्हेंबरला समजेल-उद्धव ठाकरे
भाजपा त्यांची नीती सोडत नाही. एकटा भाजपा पुन्हा सत्तेत येण्यासाठी १६० जागांच्या आसपास जागा लढवत आहे. १०० टक्के अजित पवार आणि मिंधे यांचे उमेदवार बंडखोरी करुन पाडणार. मी युतीत होतो तेव्हाही १२४ जागा स्वीकारल्या होत्या. त्यावेळी ७० ठिकाणी असंच घडलं होतं. बंडखोरी करुन जागा पाडण्यात आल्या. कपट कारस्थानी आणि पाताळयंत्री लोक म्हणजे भाजपा आहे. त्यांच्याबरोबर जे गेलेत त्यांनाही ते फेकणार आहेत. असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. लोकांच्या मनात काय आहे ते आता २३ नोव्हेंबरला कळेल. मला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. मुंबईचा विषय काढला भाषणांत की लोकच अदाणी म्हणतात. अनेक ठिकाणी भाषण करताना हा अनुभव आला आहे असंही उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) म्हणाले. तसंच राज ठाकरेंशी युती करणार नाही असंही उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) म्हणाले.
महाराष्ट्र भिकारी झाला पाहिजे असं मोदी शाह यांना वाटतं-उद्धव ठाकरे
महाराष्ट्र भिकारी झाला पाहिजे आणि भिकेचा वाडगा घेऊन माझ्यासमोर उभा राहिला पाहिजे, लाचार झाला पाहिजे असं मोदी-शाह यांचं कारस्थान आहे. या कारस्थानाला महाराष्ट्र बळी पडणार नाही. मला नकली संतान म्हणण्यापर्यंत मजल गेली. २०१९ पर्यंत मी त्यांच्यासाठी व्यवस्थित होतो. मला त्यांनी हे म्हटलं आहे हे जिव्हारी नक्कीच लागलं आहे कारण त्यांनी माझ्या आई वडिलांचा अपमान केला आहे असंही उद्धव ठाकरे म्हणाले. मला नकली संतान म्हणता, तुमची लायकी काय? असाही सवाल उद्धव ठाकरेंनी ( Uddhav Thackeray ) केला आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी ( Uddhav Thackeray ) भाष्य केलं आहे.
राज ठाकरेंशी युती करणार नाही-उद्धव ठाकरे
“महाराष्ट्राचे लुटारु नकोत. राज ठाकरेंनी तर जाहीर केलं आहे कोण मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. महाराष्ट्राचा लुटारु मुख्यमंत्री होणार असेल आणि त्यांना त्यांचा पाठिंबा असेल तर माझी युती होऊ शकत नाही. मी माझ्या महाराष्ट्राशी बांधील आहे. माझ्या वडिलांनी शिवसेना या पक्षाची स्थापना शेतकऱ्यांना, भूमीपुत्रांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी केली. महाराष्ट्राच्या लुटारुंना खुर्ची मिळवून देण्यासाठी नाही केली. त्यामुळे माझं धोरण स्पष्ट केलं आहे. तसं धोरण त्यांनी करावं, पक्षाचं नेमकं नाव काय आहे? मनसे आहे की गुंतसे आहे ते त्यांनी (राज ठाकरे) ठरवावं. मला क्लेशकारक वाटतं आहे पण माझं नातं माझं महाराष्ट्राशी रक्ताचं नातं आहे. हा लुटणाऱ्यांना लुटारुंना मदत करणं म्हणजे मी महाराष्ट्राशी विश्वासघात करणं आहे. महाराष्ट्राचा विश्वास घात ज्यांनी केला आहे त्यांना पाठिंबा देणाऱ्यांशी मी युती करु शकत नाही. त्यांनी जर स्पष्ट सांगितलं असतं महाराष्ट्र द्रोही राज्यावर येता कामा नयेत मी काहीही केलं असतं. महाराष्ट्र द्रोह्यांना मी मदत करणार नाही. उघड पाठिंब्याला मी बिनशर्ट पाठिंबा म्हटलं होतं. आता इन शर्ट पाठिंबा त्यांनी दिला आहे.” अशी बोचरी टीका उद्धव ठाकरेंनी ( Uddhav Thackeray ) केली.